पाचोरा, प्रतिनिधी | येथील पीपल्स बँकेतील कथित गैरव्यवहार व अपहारप्रकरणी बँकेचे सभासद संदीप महाजन यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील तीनही संशयितांना पोलिसांनी फरार घोषित केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, बँकेवर सध्या नियुक्तीस असलेल्या दोन्ही प्रशासकांचे पोलीस ठाण्यात इन कॅबीन जबाब नोंदविण्यात आले आहेत त्यामुळे हे प्रकरण नेमके काय कलाटणी घेते ? याबाबतची उत्सुकता व चर्चा वाढली आहे.
पाचोरा पीपल्स बँकेचे माजी चेअरमन अशोक संघवी, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन टिल्लू व संचालक किशोर शिरोडे यांनी रिझर्व बँकेच्या नियमाची पायमल्ली करून आर्थिक व्यवहाराबाबतचे व चेक डिस्काउंटींग बाबतचे नियम न पाळता पदाचा गैरवापर करत मनमानी कारभार करून संगनमताने गैरव्यवहार व अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चेक डिस्काउंटप्रकरणी १ एप्रिल २०१८ ते ९ नोव्हेंबर २०१८ दरम्यान लाखोंचा गैरव्यवहार, प्रशासकाच्या कारकीर्दीतही अशोक संघवी यांनी काही ठेकेदारांची बिले मंजूर करून ती देय करून केलेला गैरव्यवहार आणि संघवी यांनी आप्तेष्टांना कमी दराने कर्ज दिले व ठेवीवर जास्त व्याज देऊन पदाचा केलेला दुरुपयोग, अशा विविध आरोपप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा आधारे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे पुढील चौकशी करीत आहेत.
नलावडे यांनी बँकेकडे गतकाळातील आर्थिक व्यवहार, आजी-माजी कर्मचारी व संचालकांबाबतची माहिती लेखी पत्राद्वारे मागवली आहे. सध्या नियुक्तीस असलेले प्रशासक सी.ए. प्रशांत अग्रवाल व अॅड. प्रशांत कुलकर्णी यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे इन कॅबीन जवाब नोंदवण्यात आले आहेत. दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी संशयित अशोक संघवी, नितीन टिल्लू व किशोर शिरोडे यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत, त्यामुळे त्यांना फरार घोषित करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले आहे.