पाचोरा प्रतिनिधी । येथील गांधी चौकातील मुथा ज्वेलर्सचे मालक प्रकाश शेठ मुथा यांनी त्यांच्या मातोश्री सरलाबाई मुथा यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पाचोरा कन्या विद्यालयात विद्यार्थ्यांना ४० शालेय गणवेश व २०० वह्यांचे वाटप केले. २ जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमाने समाजाला आईबद्दलच्या कृतज्ञतेचा नवा संदेश मिळाला. येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सरलाबाई मुथा, प्रकाश शेठ मुथा, राजेंद्र बांठिया, विजय बर्मट, सुनील शिंदे, अनिल आबा येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मातोश्री सरलाबाई मुथा व मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थिनींना शालेय गणवेश व वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुनील शिंदे यांनी आईची महती स्पष्ट करून प्रकाश शेठ मुथा यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. मिळालेल्या शैक्षणिक साहित्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.