एटीएम मशिन चोरून नेण्याचा प्रयत्न फसला

पाचोरा, प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम मशिन चोरून नेण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून याची चाहूल लागल्याने चोरट्यांचा हेतू यशस्वी झाला नाही. मात्र पोलिसांनी पीक अप व्हॅनमधून पळ काढणार्‍या चोरट्यांचा पाठलाग केला असता चोर व्हॅन सोडून पसार झाले. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील भडगाव रोड वरील स्टेट बँकेचे एटीएम मंगळवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास एटीएम च्या समोरील काच चोरट्यांनी फोडल्याचा आवाज ऐकून आशीर्वाद प्लाझाचे शिपाई अल्पेश बापू तावडे, याने मालक मुकुंद बिल्दीकर यांना आरडा ओरडा करून सांगितले. मुकुंद बिल्दीकर यांनी तातडीने खाली येऊनव लागलीच पोलीस हवालदार राहुल बेहेरे यांना त्याबाबत कळवले. त्या आधारे बेहरे यांनी पोलीस हवालदार किरण पाटील यांच्याशी संपर्क साधला. दोघे स्टेट बँके जवळ पोहोचले तोपर्यंत चोरटे पसार झाले.

दरम्यान, दोन्ही पोलीस कर्मचार्‍यांनी भडगाव रोड, जारगाव चौफुली, जळगाव रोड, जामनेर रोड अक्षरशः पिंजून काढला. यात त्यांना भडगाव रोड भागात पीक अप व्हॅन भरधाव जात असल्याचा संशय आल्याने राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. ते पिकअप व्हॅन चालकाच्या लक्षात आल्याने त्याने पांडव नगरीच्या रस्त्याने गाडी वळवली व गाडी मागे असलेल्या राहुल बेहरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी अंगावर आणली व पुन्हा पलायन करण्याचा प्रयत्न केला. अशाही परिस्थितीत न घाबरता राहुल बेहरे यांनी गाडीचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी सदरची गाडी ही भट्टगाव रस्त्याला लावली पुढे रस्ता नसल्याने गाडी पिकप व्हॅन सोडून चोरटे पसार झाले. या गाडीत जाड दोरखंड, लोखंडी अवजारे आढळून आली.

ए.टी.एम. मशिन गाडीत टाकून नेण्याचा त्यांचा मानस असावा असा संशय आहे. भट्टगांव शिवारात गाडीतील साहित्याच्या आधारे श्‍वान पथकास पाचारण करून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मुकुंद बिल्दीकर यांची सजगता व राहुल बेहरे, किरण पाटील यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

नंबर प्लेट झाकली

एसबीआयचे ए. टी. एम. मशिन पळवून नेण्यासाठी पीकअप वाहनावर एम. एच. ०६ ऐ. जी. १०४१ हा नंबर असून हा क्रमांक कागद चिकटवून झाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आनले आहे. घटनेचा प्रकरणी मुकुंद बिल्दीकर यांचे शिपाई अल्पेश बापू तावडे याने पाचोरा पोलीस ठाण्यात तीन संशयित व अनोळखी सुमारे २५ ते ३० वयाच्या इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील हे करीत आहेत. संशयित आरोपींच्या अटकेसाठी एक पथक तयार करण्यात आले आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, विकास पाटील यांनी पाहणी केली. यानंतर श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

वस्तूंची केली मोडतोड

एसबीआयचे एटीएम मशिन पळवून नेण्यासाठी तीन संशयित वाहन घेऊन आले होते. त्यांचा एटीएम मधून पैशाची चोरी न करणा थेट मशिनच पळून नेण्याचा प्रयत्न होता. मशिन चोरण्यासाठी चोरट्यांनी मशिनच्या वायरी तोडून बाहेरील दरवाचा व सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तोडफोड आणि काचांची तोडफोड करण्यात सुमारे १ हजार ५०० रुपयांचे नुकसान केले. मात्र शिपायच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. शहरातील अनेक वेळा अनेक ए. टी. एम. मशिन फोडून चोर्‍या झाल्य आहेत. असे असतांना या ठिकाणी बँकेने वाचमन ठेवण्यची तसदी घेतलेली नाही. या बाबत नागरीकांकडून आचर्य व्यक्त केले जात आहे.

Protected Content