पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरासह तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कृष्णापूरी भागातील हिवरा नदीच्या पुलावरून 18 वर्षीय तरूण पडून वाहून गेल्याची घटना बुधवारी घडली होती. आज दुपारी त्या तरूणाचा मृतदेह स्मशानभूमीजवळ आढळून आला असून याबाबत पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, दोन दिवसांपासून पावसाने पाचोरा तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. शहरातील कृष्णापूरी परीसरात असलेल्या हिवरा नदीला दोन दिवसांपासून पुर आल्याने दोन्ही भागाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान शिवकॉलनी परीसरातील जितेंद्र महाजन (वय-18) या तरूणाचा पाय घसून पुराच्या पाण्यात बुधवारी वाहून गेला होता. आज 18 तासांनंतर दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाचोरा स्मशानभूमीजवळ आढळून आला. स्थानिक रहिवाशी आणि प्रशासनाच्या पथकाच्या मदतीन मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेबाबत परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जळगाव-पाचोरा बस फेऱ्या बंद
पाचोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पुर आला आहे. यामुळे पाचोरा शहरातून जाणाऱ्या हिवरा नदीला प्रचंड प्रमाणावर पूर आला आहे. मात्र या नदीवरील पुलाचे बांधकाम गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याने अजूनही अपुर्णावस्थेत असल्याने केलेला पर्यायी रस्ता पुर्णपणे वाहून गेल्याने वाहनांची वाहतूकी पुर्ण थप्प झाली आहे. सोबत जळगाव-पाचोरा या बसच्या फेऱ्या काल सायंकाळपासून बंद करण्यात आले आहे.