पाचोरा प्रतिनिधी । वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचार्यांनी थकबाकीच्या नावाखाली शेतकर्यांचा वीज पुरवठा खंडित करू नका असा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला आहे.
आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत वीज वितरण कंपनीच्या प्रशासनाला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, शेतकर्यांचा थकबाकी अभावी वीजपुरवठा खंडित करणे ५ जूनपर्यंत बंद न केल्यास ६ जूननंतर एकाही अधिकार्यास खुर्चीवर बसू देणार नाही.
वीज वितरण कंपनीने शेतकर्यांच्या थकीत बिलापोटी वसुली करून त्यातील ३५ टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावर, ३५ टक्के रक्कम तालुकास्तरावर व उर्वरित ३० टक्के रक्कम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत खर्च करून वीज वितरण कंपनीचे कामे करण्याची चांगली योजना ४ महिन्यांपूर्वी आणली होती. मात्र, वसुलीचा विपर्यास करून वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी एकाही शेतकर्याच्या शेतात मीटर नसताना अव्वाच्या सव्वा बिले देऊन सक्तीची वसुली करत असल्याचा आरोप आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, शेतकर्यांना जर त्रास होत असेल तर मी शासनात असल्याचे विसरून शेतकर्यांसाठी रस्त्यावर येऊन शिवसेना स्टाइलने वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
आमदार पाटील म्हणाले की, खान्देशात ज्या शेतकर्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी असेल ते शेतकरी १५ मे पासून कापसाची लागवड करतात. मात्र वसुलीच्या नावाखाली वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी शेतकर्यांची पिळवणूक करत आहेत. याबाबत अधिकार्यांनी ५ जूनपर्यंत निर्णय न घेतल्यास आमदार असल्याची व राज्यातील सत्तेत सहभागी असल्याचे विसरून एकाही अधिकार्यांना खुर्चीवर बसू देणार नाही व कर्मचार्यांनाही गावात फिरू देणार नाही. यासाठी जे परिणाम होतील, त्यास सामोरे जाण्यास तयार आहे. शेतकर्याला जर त्रास होत असेल तर मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.