जळगाव प्रतिनिधी । आमदार किशोर पाटील यांनी कुर्हाड खुर्द येथील दक्ष हमाल-मापाडी सहकारी संस्थेबाबत तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी या संस्थेचे पुरवठा विभागाचे कंत्राट रद्द केले आहे.
याबाबत वृत्त असे की, जिल्हा पुरवठा विभागांतर्गत गोदामांमध्ये काम करणार्या हमाल-मापाडींच्या कंत्राटावरून पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील हमाल-मापाडींच्या कंत्राटाचे पेमेंट थांबवण्याचे आदेश दिले होते. दक्ष हमाल-मापाडी सहकारी संस्थेच्या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली होती. त्या विरुद्ध कंत्राटदाराने उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाद मागितली होती. खंडपीठाने या संस्थेचे कंत्राट नियमित करण्यात यावा किंवा रद्द करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले होते. या कंत्राटाबाबत पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करून पोलिस तपासानुसार दक्ष हमाल-मापाडी सहकारी संस्थेचे कंत्राट रद्द करण्यात आले.
संबंधीत संस्थेतर्फे हमाल, मापाडींना त्यांचा पूर्ण मोबदला देण्यात येत नसल्याबाबत तक्रारी होत्या. यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आले असून कारवाईनतंर हे कंत्राट इतर संस्थांना जोडण्यात आले आहे.