पाचोरा प्रतिनिधी । राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी भरण्याची प्रक्रिया ऑफलाइन करावी, अशी मागणी भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत. यामुळे राज्यभरातुन लाखो उमेदवार नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पुढे सरसावले आहेत. मात्र ऑनलाइन नामनिर्देशन प्रक्रिया प्रचंड संथ गतीने, किचकट तसेच वेळेचा अपव्यय करीत असल्याने लाखो इच्छुक उमेदवार निवडणूक प्रक्रियेपासुन वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करून राज्यभरातील ग्रामपंचायत उमेदवारांची नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन करावी अशी मागणी पाचोरा तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोल शिंदे (Amol Shinde Pachora )यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे.
ग्रामपातळीवरील लोकशाहीचे आद्य केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत मध्ये उमेदवारी करून आपल्या नेतृतवाचे पंख विस्तारण्यासाठी सरसावलेल्या लाखो उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर (साईटवर) नाव नामनिर्देशन पत्रांसाठी एकच गर्दी केलेली आहे. परिणामी शासनाच्या या निवडणूक पोर्टलवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक व ताण निर्माण झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. वारंवार अडचण येत असल्याने एकच अर्ज पुन्हा पुन्हा भरावा लागत आहे. या ऑनलाइन प्रक्रियेत वेळेचा अपव्यय होत असून उमेदवारांना रात्री – बेरात्री, उशिरापर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तातकळत बसावे लागत आहे. युवा उमेदवारांना सोबतच ज्येष्ठ नागरिक व महिला उमेदवारांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. सदरची ऑनलाइन प्रक्रिया अशाच पद्धतीने त्रासदायक, किचकट व संथ गतीने सुरु राहिली तर अनेक इच्छुक उमेदवार आपल्या लोकशाहीच्या हक्कापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ऑनलाइन पोर्टलच्या भवश्यावर राहिल्यामुळे मागील निवडणुकीत सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात ऑफलाइन उमेदवारी अर्ज भरण्याचा परवानगी देण्यात आली होती आणि त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पूर्वानुभव व या सर्व परिस्थितीचा तसेच संभाव्य धोक्याचा तातडीने विचार करून राज्यभरातील ग्रामपंचायत उमेदवारांना तातडीने विनाविलंब ऑफलाईन अर्ज भरण्याची मुभा द्यावी, अशी विनंती भारतीय जनता पार्टी चे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल पंडितराव शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. तसेच या विनंतीच्या प्रती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव, पाचोरा तहसिलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी पाचोरा यांच्याकडे पाठवल्या आहेत.