पाचोरा प्रतिनिधी । राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅन इंडिया अवेरनेस अँड आउटरिच हा ४५ दिवसांच्या कार्यक्रमाचे दि. २ ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज पाचोरा न्यायालयात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी, सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील मंचावर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना तालुका विधी सेवा समितीचे सहाय्यक दिपक तायडे यांनी ४५ दिवसात घ्यावयाचे कार्यक्रम, उद्देश, महत्व सांगितले. त्यानंतर तहसिलदार कैलास चावडे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच एफ. के. सिद्दीकी आणि अॅड. प्रविण पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यानंतर “पॅन इंडिया अवरनेस अँड आउटरिच प्रोग्राम” या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तदनंतर रॅली ला सुरुवात झाली.
रॅली न्यायालयातून निघून रिंग रोड, राजे संभाजी चौक, नवजीवन शॉप, भुयारी मार्गाने पुन्हा न्यायालयात रॅलीचा समारोप झाला. यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. बी. सुरवाडे, नगरपालिका प्रतिनिधी हंसराज राठोड, ग्रामीण रुग्णालयाचे बी. एन. पांडे, पाचोरा पो. स्टे. कर्मचारी, ट्रॅफीक कर्मचारी, विधी शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वकील संघाचे वरीष्ठ, कनिष्ठ सदस्य, उपाध्यक्ष अॅड. अरुण भोई, तालुका विधी समितीचे वरिष्ठ सहाय्यक अमित दायमा, न्यायालयीन कर्मचारी, विधी शाखेचे विद्यार्थीसह आदींनी परिश्रम घेतले.