जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेना जळगावच्या वतीने सलग पाचव्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुमार गट बास्केटबॉल स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पाचोरा बास्केटबॉल क्लब तर मुलींच्या गटात सेंट जोसेफ हायस्कूल, जळगाव या संघांनी विजेतेपद पटकावत बाजी मारली.
शुक्रवार, दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने करण्यात आले होते. स्पर्धेत 12 मुलांचे व 6 मुलींचे संघ अशा एकूण 18 संघांनी सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यांतून विद्यार्थ्यांनी आपली खेळातील गुणवत्ता आणि जिद्द दाखवत उपस्थितांची मने जिंकली.

या स्पर्धेचे उद्घाटन व प्रमुख उपस्थिती शिवसेना उपनेत्या तथा मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती सदस्य शितल देवरूखकर-शेठ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत युवासेना कार्यकारिणी सदस्य अभिषेक शिर्के, उपनेते गुलाबराव वाघ, उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडिया, जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे प्रभारी सचिव जितेंद्र शिंदे आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुलांच्या गटात पाचोरा बास्केटबॉल क्लबने प्रथम क्रमांक पटकावला, तर चाळीसगाव राष्ट्रीय क्रीडा मंडळ दुसऱ्या स्थानावर राहिला. तिसरा क्रमांक जळगाव जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनने मिळवला. मुलींच्या गटात सेंट जोसेफ हायस्कूलने विजेतेपद मिळवले तर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने दुसरे व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनने तिसरे स्थान प्राप्त केले.
स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा मान मुलांमध्ये चाळीसगावच्या लवनेश पाटील याला, तर मुलींमध्ये जळगावच्या धनश्री पाटील हिला मिळाला. दोघांनाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात अयाज मोहसीन यांनी सूत्रसंचालन केले तर तांत्रिक आयोजनाची जबाबदारी बास्केटबॉल असोसिएशनने पार पाडली.
ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती जिल्ह्यातील तरुणांना खेळाकडे वळवण्याचा आणि त्यांच्यातील नेतृत्व, संघभावना आणि जिद्द विकसित करण्याचा एक उत्कृष्ट उपक्रम ठरला. युवासेनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



