पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील ताडीचे दुकान कायम स्वरूपी बंद करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राज्य उत्पादन शुल्क खात्याला देण्यात आले आहे.
पाचोरा शहरातील ताडीचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. या मागणीचा अर्ज वजा तक्रार पाचोरा येथील संविधान आर्मी रक्षक सैनिक रमेश (छोटु) पंडित सोनवणे यांनी जळगांवचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांचेकडे केला आहे. सदरील ताडीचे दुकान कायमस्वरूपी बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील रमेश सोनवणे यांनी अर्जाद्वारे प्रशासनास दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा शहरातील बर्याच कुटुंबातील कर्ते व्यक्ती ताडीच्या आहारी जात आहे. तसेच गरीब मोल मजुरी करणार्यांचे संसार उध्वस्त देखील होत आहे. घरातील कर्ते व्यक्ती व तरुण वर्ग ताडीच्या आहारी जाऊन कष्टाचे पैसे घालवत आहेत. व त्यांचे कुटुंब रस्त्यावर येत आहे. असे असतांना देखील दुकानाचा परवाना नुतनीकरण करून पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. सर्व महिलांचे व सामान्य जनतेच्या परिवाराचे मोठे नुकसान होत असुन जळगांव जिल्ह्यात ताडीची वृक्ष नसतांना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात ताडी येते कुठुन ? याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला असुन सुद्धा ते डोळे झाक करीत असल्याचे निष्पन्न होत आहे. अशा विषारी ताडीचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील रमेश (छोटु) सोनवणे यांनी जळगांवचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांचेकडे अर्ज वजा तक्रारी द्वारे केले आहे.
या तक्रार अर्जाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, जिल्हाधिकारी, जळगांव, पोलिस अधीक्षक, जळगांव, उपविभागीय अधिकारी, पाचोरा, उपविभागीय पोलिस अधिकारी, पाचोरा, तहसिलदार, पाचोरा, पोलिस निरीक्षक, पाचोरा, नगरपालिका मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.