पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गाळण येथे परिक्षेसाठी जाणार्या जळगाव येथील युवतीला रेल्वे गाडी पाचोर्याला न थांबल्यामुळे प्राण गमवावे लागले आहे. तर तिला घेऊन जाणार्या तरूणाच्या पाठोपाठ या विद्यार्थीनीचाही अपघातात मृत्यू झाला आहे.
जळगाव येथील विद्यार्थिनी पायल कैलास पवार (वय १९, रा.शिवाजीनगर, जळगाव) हिने बारावीच्या परीक्षेसाठी तिने गाळण (ता.पाचोरा) हे केंद्र निवडले होते. गुरुवारी सकाळी पायल मराठीचा पेपर देण्यासाठी जळगावहून पाचोर्याला रेल्वेने येण्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर आली. मात्र, नजरचुकीने ती जलद गाडीत बसली. यामुळे या ट्रेनने पाचोर्याऐवजी चाळीसगावला थांबा घेतला. यामुळे तिने मदतीसाठी आयुष अकॅडमीच्या शिक्षकांना फोनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यामुळे अकॅडमीच्या शिक्षकांनी तत्काळ कन्नड तालुक्यातील पांगरे येथील तेजस सुरेश महेर या विद्यार्थ्याशी संपर्क साधून त्याला चाळीसगाव येथून पायलला सोबत घेऊन गाळणला सोडून देण्याची विनंती केली.
त्यानुसार तेजस हा पांगरे येथून चाळीसगाव स्थानकावर गेला. एम.एच.१४-जी.क्यू.४१४४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून तो पायलला घेऊन चाळीसगाव येथून गाळण येथील परीक्षा केंद्राकडे निघाला. दरम्यान, भडाळी-भामरे रस्त्यावर पिकअप व्हॅनने (क्र.एम.एच.१९-सी.वाय.३४३१) दुचाकीला धडक दिली. या अपघातात तेजस महेर याचा जागीच मृत्यू झाला. तर पायल पवार ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचार सुरू असतांना तिची प्राणज्योत मालवली.
दरम्यान मयत तेजस आणि पायल हे दोन्ही जण पोलीस भरतीची तयारी करत होते. मात्र भरतीची स्वप्नपूर्ती होण्याआधीच त्यांच्यावर काळाने क्रूर झडप घातल्याने परिसरातून शोक व्यक्त होत आहे.