पाचोरा (प्रतिनिधी) शहरात मागील वर्षापर्यंत पाणपोईंची संख्या बऱ्यापैकी होती. परंतु यंदाच्या उन्हाळ्यात मात्र, शहरातील अनेक पाणपोया बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. अनेक प्याऊ केवळ मागील वर्षी सुरू करून बंद करण्यात आल्यामुळे तेथे कचरा, घाण साचली आहे. एकंदरीत शहरातील बहुतांश पाणपोईंची दुर्दशा झालेली असल्याचे चित्र आहे.
पाणी हे जीवन आहे, म्हणूनच कदाचित आपल्या पूर्वजांनी पाण्याला थेट धर्माची उपमा दिलीय. साध्या पाण्यानेही मोठे धर्मकारण साधले जाऊ शकते, हाच संदेश यातून द्यायचा होता. तो संदेश समाजापर्यंत नीट पोहोचला अन् एखाद्याची तृष्णा भागवण्याला पुण्याचे काम समजले जाऊ लागले. म्हणूनच कधी काळी उन्हाळा आला की, आपल्या पाचोरा तालुक्यातील सहृदयी माणसे चौकचौकात पाणपोई उभारायचे. परंतु पुढे काळ बदलला आणि पाणी हे पुण्याचे नसून व्यवसायचे माध्यम झाले. आता शहरात अपवादानेच पाणपोया दिसतात. परिणामी साधे पाणीही विकत घेऊन प्यावे लागते. अन् ज्यांच्यात ते विकत घेण्याची क्षमता नसते ते बिचारे कोरड्या गळ्यानेच रखरखत्या उन्हात धावत असतात पोटासाठी. तहानलेल्यांना पाणी पाजून त्याची तृष्णा भागवण्यात फार मोठे पुण्य लाभते. यामुळे अनेक समाजसेवी संस्था, संघटनांतर्फे शहरातील चौकाचौकात प्याऊ लावण्यात येतात. रस्त्याने जाणाऱ्याला तहान लागली की तो या प्याऊमधील पाणी पिऊन पुढे जातो. मागील वर्षापर्यंत शहरात प्याऊंची संख्या बऱ्यापैकी होती. परंतु यंदाच्या उन्हाळ्यात मात्र शहरातील अनेक प्याऊ बंद पडलेल्या अवस्थेत आढळून आले. अनेक प्याऊ केवळ मागील वर्षी सुरू करून बंद करण्यात आल्यामुळे तेथे कचरा, घाण साचली आहे. त्यामुळे उपराजधानीच्या दातृत्वाची भावना लोप होत चाललीय की काय, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.
पाणी बॉटलची विक्री वाढली शहरात अचानक प्याऊंची संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे चौकाचौकात पानठेला चालक, चहा विक्रेते थर्माकोलच्या डब्यात पाणी बॉटल विक्रीसाठी ठेवत असल्याचे चित्र दिसले. १० रुपये देऊन एक बॉटल विकण्यात येते. त्यामुळे एखाद्या गरिबाला तहान लागल्यास आणि त्याच्या खिशात पैसे नसल्यास त्याचा नाईलाज होत आहे.तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी सामाजिक संघटना सह दात्यानी पाणपोई कडे पाठ फिरवली आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकजवळ, पाचोरा बस स्टॅन्ड, एम.एम. कॉलेज चौक, जिल्हा परिषद मराठी शाळा, जामनेर रोड या ठिकाणी शासकीय निमशासकीय लाखो रुपये खर्चून बांधलेल्या पाण्या अभावी पाणपोई रिकाम्या पडून आहेत. थकल्या प्रवाशाला व रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांना दोन पाण्याचे घोट मिळावेत म्हणूनच या हेतूने उभारलेल्या पाणपोईमध्ये पाण्याचा थेंबही साचत नसल्याने मूळ हेतूला हरताळ फासला गेला आहे. याकडे नगरपालिकासह सामाजिक संघटना व शहरातील प्रतिष्ठीक दात्यांनी याकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी प्रवाशांची तहान भागवण्यासाठी पाणपोईची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, त्या टाक्या कधी स्वच्छ करून धुतल्या जात नाही. त्यात पाणी टाकले जात नसल्याने व नगरपालिका प्रशासनाकडून या पाणपोईंची निगा योग्य पद्धतीने राखली न गेल्याने त्या बंद स्थितीत आहेत. याचं बरोबर सामाजिक संघटनासह दात्यांनी देखील या पाणपोईकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. शहरातील बस स्टँड, रेल्वे स्टेशन, कॉलेज चौक, जामनेर रोड, आठवडे बाजारजवळ पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षापासून त्याकडे दुर्लक्ष झाले असून उन्हाळ्याच्या ४०.४5 डिग्रीच्या तापमानात तहानलेल्या प्रवाशी नागरिकांना दोन घोट पाण्यासाठी भटकावे लागत आहे.