Home आंतरराष्ट्रीय पी. व्ही. सिंधूने सांगितला दुबई विमानतळावरील थरारक अनुभव

पी. व्ही. सिंधूने सांगितला दुबई विमानतळावरील थरारक अनुभव


दुबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबई विमानतळावर अडकलेल्या भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने अवघ्या १०० मीटर अंतरावर झालेल्या स्फोटाचा थरारक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘ऑल इंग्लंड’ स्पर्धेसाठी यूकेकडे रवाना झालेल्या सिंधूच्या प्रवासात अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी कराराच्या चर्चेच्या तीन फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायल यांनी शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये २०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले आहेत. अनेक ठिकाणी हल्ले सुरूच असल्याने मध्य पूर्वेतील तणाव अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अनेक प्रवासी विविध विमानतळांवर अडकले.

पी. व्ही. सिंधू बेंगळुरूहून ‘ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप’मध्ये सहभागी होण्यासाठी यूकेमधील बर्मिंगहॅम येथे जात होती. तिचे विमान दुबईत उतरले असताना अचानक परिस्थिती बिघडली. काही तासांतच हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आणि विमानसेवा विस्कळीत झाली. “गेल्या काही तासांपासून प्रचंड तणाव होता. विमानांचे आवाज सतत ऐकू येत होते. आम्ही जिथे अडकलो होतो, त्या ठिकाणापासून अगदी जवळ स्फोट झाला,” असे सिंधूने व्हिडिओत सांगितले.

तिने पुढे सांगितले की, तिचे प्रशिक्षक त्या स्फोटाच्या ठिकाणापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर होते. स्फोट होताच त्यांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. “इतक्या जवळ अशी घटना अनुभवणे हादरवून टाकणारे होते. आपल्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींशी असे काही घडेल, अशी अपेक्षा कधीच नसते. पण काही वेळा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर असते,” असे ती म्हणाली. या संकटाच्या क्षणी तिच्या टीमने दाखविलेला संयम आणि एकजूट हीच खरी ताकद असल्याचेही तिने नमूद केले.

सिंधूने सांगितले की, सध्या ती आणि तिची टीम सुरक्षित ठिकाणी असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयाने तात्काळ संपर्क साधून आवश्यक मदत पुरवली. “आम्ही अडकलो आहोत, हे कळताच त्यांनी वेगाने पावले उचलली. केवळ आम्हालाच नव्हे, तर इतर अडकलेल्या भारतीयांनाही मदत केली,” असे ती म्हणाली. कठीण परिस्थितीत सातत्याने संपर्कात राहिल्याबद्दल तिने अधिकाऱ्यांचे आभार मानले.

दरम्यान, दुबई विमानतळावरील कर्मचारीही प्रवाशांच्या मदतीसाठी अहोरात्र कार्यरत असल्याचे सिंधूने नमूद केले. शेकडो प्रवासी अडकले असून सर्वांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कर्मचारी न थकता प्रयत्न करत आहेत. या सर्वांच्या सहकार्यामुळेच भीतीच्या वातावरणातही धैर्य टिकवता आले, असेही तिने सांगितले.


Protected Content

Play sound