औरंगाबाद प्रतिनिधी । ‘मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन’च्या (एमआयएम) उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात औरंगाबाद येथून 2 ऑक्टोबर रोजी होणार असून पक्षप्रमुख खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या सभेने प्रचारास सुरुवात होणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की औरंगाबादसह राज्यातील विविध भागातून आतापर्यंत ‘एमआयएम’ने १८ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. एक ऑक्टोबरपर्यंत अन्य मतदार संघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. ‘एमआयएम’ने ५० उमेदवार विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती औरंगाबाद येथील पक्ष कार्यालयात सुरू आहे. ‘एमआयएम’तर्फे घोषित करण्यात आलेल्या उमेदवारांच्या प्रचाराची सुरवात दोन ऑक्टोबर रोजी केली जाणार आहे. औरंगाबाद शहरातील तिन्ही उमेदवारांसाठी ओवेसींच्या उपस्थितीत प्रचारफेरी काढण्यात येणार आहे. या प्रचारफेरीनंतर औरंगाबादेत ओवेसींच्या सभेचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ‘एमआयएम’कडून देण्यात आली आहे.