Home आरोग्य जळगावात मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावात आयोजित करण्यात आलेल्या मोफत तिरळेपणा व पडलेल्या पापणीच्या तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, या उपक्रमामुळे स्थानिक रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत जळगावातच अत्याधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज उरलेली नाही.

जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे १ व २ एप्रिल रोजी आयोजित शिबिरात सुमारे १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर ७५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले असून, उर्वरित रुग्णांना पुढील उपचारासाठी आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. या शिबिरासाठी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. मधुसूदन झंवर स्वतः जळगावात दाखल झाले असून, ते ५ एप्रिलपर्यंत शस्त्रक्रिया करणार आहेत. त्यांच्या सोबत २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीमही कार्यरत आहे. डॉ. झंवर यांना तिरळेपणा शस्त्रक्रियेचा तीन दशकांहून अधिक अनुभव असून, त्यांनी ग्रामीण व शहरी भागात १९८ हून अधिक नेत्रशिबिरे यशस्वीपणे आयोजित केली आहेत.

या टीमच्या कार्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. त्यामुळे या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तिरळेपणा मुक्त जळगाव जिल्हा हा उद्देश ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील रुग्णांसाठी ही एक मोठी संधी ठरत आहे. शिबिरादरम्यान बाहेरगावाहून आलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची व जेवणाची सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे दूरवरच्या भागातील रुग्णांनाही या सेवांचा लाभ घेणे सोपे झाले आहे.

 


Protected Content

Play sound