जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून निस्वार्थ सेवा देत महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित कार्य करणारे जळगाव येथील महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा ‘मॉग्स-अमॉग्स वॅलर अवॉर्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे आयोजित ‘अमॉग्स २०२६’ या राज्यस्तरीय परिषदेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. संकटकाळात धैर्याने आणि शांतपणे कार्य करून रुग्णांचे प्राण वाचविण्यात दिलेल्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईतील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिअट इंटरनॅशनल (सहार) येथे ही राज्यस्तरीय परिषद संपन्न झाली. मुंबई ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (MOGS) आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज (AMOGS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. १४ मार्च रोजी झालेल्या ‘स्त्री गौरव’ पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. सुधीर नारखेडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

‘मॉग्स-अमॉग्स वॅलर अवॉर्ड’ हा पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत कठीण प्रसंगात, आणीबाणीच्या परिस्थितीत आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांदरम्यान धैर्याने काम करणाऱ्या डॉक्टरांना सन्मानित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. महिलांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रसंगी तत्परतेने निर्णय घेऊन रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या डॉक्टरांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी ‘टीम मॉग्स २०२५-२६’ ने हा विशेष उपक्रम सुरू केला आहे.
डॉ. सुधीर नारखेडे हे जळगाव येथील महादेव हॉस्पिटलमध्ये हाय डिपेन्डन्सी युनिटचे प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या दीर्घ वैद्यकीय कारकिर्दीत हजारो महिलांना उपचार देत सुरक्षित मातृत्वासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अनेक गुंतागुंतीच्या प्रसूती व शस्त्रक्रियांमध्ये त्यांनी दाखविलेल्या धैर्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. संकटकाळात सहकाऱ्यांना मार्गदर्शन करत वैद्यकीय सेवेचा उच्च आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.
या राज्यस्तरीय सन्मानामुळे जळगाव जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्राचा मान उंचावला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. डॉ. सुधीर नारखेडे यांच्या या यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



