नवी दिल्ली । आमचा मंच हा खुला, पारदर्शक आणि पक्षपात विरहित आहे, असे फेसबूक इंडियाने स्पष्ट केले आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भारतातील फेसबुक व्हॉट्स अॅपवर भाजपाचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता.
फेसबूक इंडियाचे उपाध्यक्ष महासंचालक अजित मोहन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये यााबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यात ते म्हणतात की, फेसबुक हा एक खुला आणि पारदर्शक मंच आहे. तसेच फेसबुक कुठलाही पक्ष आणि विचारसरणीचे समर्थन करत नाही. या प्लॅटफॉर्मवर लोक आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्यावर आपले धोरण लागू करण्यामध्ये पक्षपात केल्याचा आरोप झाला आहे. आम्ही या आरोपाकडे गांभीर्याने पाहत आहोत, तसेच आम्ही द्वेष आणि कट्टरता यांचा निषेध करतो, असेही ते म्हणाले.