भुसावळमध्ये तीन दिवसीय द्वारकाई व्याख्यानमालेचे आयोजन

vyakhyanmala1

भुसावळ प्रतिनिधी।  जय गणेश फाउंडेशनतर्फे २९ जुलैपासून तीन दिवस फिरती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यंदा उपक्रमाचे पाचवे वर्ष असून एक महाविद्यालय व दोन माध्यमिक शाळांची निवड करण्यात आली आहे.  नाशिक, वाशिम, जळगावच्या वक्त्यांची नावे निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती समन्वयक अरुण मांडाळकर यांनी मंगळवारी दिली. सुरभीनगरात फाउंडेशनच्या कार्यालयात आयोजित समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

द्वारकाई कालिदास नेमाडेंच्या आठवणी चिरंतन जपण्यासाठी हा शैक्षणिक उपक्रम जय गणेश फाउंडेशनने हाती घेतला आहे. फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे यांच्या पुढाकारातून या उपक्रमाची मुहूर्तमेढ पाच वर्षांपूर्वी रोवण्यात आली आहे. मनोरंजन वाहिन्यांच्या मायाजालात अडकलेल्या नव्या पिढीला वाचन, चिंतन, मननाची गोडी लागावी या उद्देशाने वक्त्याला थेट विद्यार्थ्यांपर्यंत नेणे हा या फिरत्या व्याख्यानमालेचा उद्देश आहे, असे मांडाळकर यांनी सांगितले. व्याख्यानमालेतून ‘साहित्यिक विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या संकल्पनेला व्यापक स्वरुप देण्यात आले आहे.  माय, माती आणि माणूस अशी या वर्षाची थिम आहे. २९ ते ३१ जुलै असे तीन दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेत अनुक्रमे कोटेचा महिला महाविद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, सातपुडा शिक्षण संस्था संचलित भुसावळ हायस्कूल अशा तीन ठिकाणी ही विचारपुष्प गुंफण्यात येईल. नाशिकचे कवी प्रा. संदीप जगताप, वाशिमच्या शिक्षिका तथा शिक्षणतज्ञ उज्ज्वला मोरे, जळगावच्या आर. आर. विद्यालयाचे शिक्षक व लेखक चंद्रकांत चव्हाण अशा तीन वक्त्यांची नावे या बैठकीत निश्चित करण्यात आली.  आयोजनासाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. यात जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे, नगरसेविका सुषमा नेमाडे, समन्वयक अरुण मांडाळकर, सल्लागार गणेश फेगडे यांच्यासह सदस्यांचा समावेश आहे. विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना या उपक्रमांच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे.

Protected Content