अमळनेर (प्रतिनिधी ) येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात ९ फेब्रुवारीला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ” नऊ शुभांक’ साधात विशेष धार्मिक कार्यक्रम होणार आहे. नऊ हा श्री मंगळ ग्रहाचा शुभांक आहे. या पार्श्वभूमीवर नऊ फेब्रुवारीला मंदिरासमोरील नियोजित पाच मजली भव्य इमारतीच्या तळ मजल्यावर नऊ कुंडी श्री गायत्री महायज्ञ होईल.
या महायज्ञात ३६ जोडपे सहभागी होतील. ३६ या अंकातील तीन आणि सहाची बेरीज नऊ होते. ३६ जोडपे म्हणजे ७२ जण, या ७२ अंकातील सात आणि दोनची बेरीजही नऊ होते . शिवाय या महायज्ञास सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी प्रारंभ होईल, यातही आठ अधिक एकची बेरीज नऊ होते. अशा रीतीने नऊ तारीख, नऊ कुंडी यज्ञ , ३६ जोडपे , ७२ जण व आठ वाजून एक मिनिटांचा मुहूर्त असा एकूणच नऊ या शुभांकाचा आगळा – वेगळा व प्रथमच धार्मिक कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे याच सुमुहूर्तावर श्री मंगळ ग्रह मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरील नियोजित पाच मजली इमारतीच्या ६५ × ११५ फुटी स्लॅबच्या कामासही प्रारंभ होणार आहे . या स्लॅबला एकही कॉलम नाही , हे विशेष. अद्ययावत पिटी स्लॅबच्या तंत्रज्ञानाचा यात वापर होणार आहे . स्टील डिझाइन दीर्घानुभवी ख्यातनाम अभियंता सतीश लाठी(जळगाव) यांचे आहे. अमळनेरचे वास्तूतज्ञ संजय पाटील यांची इमारत निर्माण कार्यात देखरेख असेल.
या महायज्ञात सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी महत्वाच्या सूचना
(१) पुरुषांनी शक्यतो पिवळा नेहरू शर्ट व पायजमा तर महिलांनी पिवळी साडी परिधान करावी. पुरुषांकडे पिवळा नेहरू शर्ट नसल्यास पिवळा शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान करावी. हे ही नसल्यास पांढरा किंवा भगवा / नारंगी नेहरू शर्ट व पांढरा पायजमा परिधान करावा. महिलांनी साडी ऐवजी पिवळा पंजाबी ड्रेस परिधान केला तरी चालेल
(२) सर्वांनी सकाळी सव्वा सातपर्यंत श्री मंगळदेव ग्रह मंदिरात यावे
(३) सकाळी साडे सात वाजता सर्वांना चहा व नाश्ता दिला जाईल
(४) सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सर्व जण आसनस्थ होतील
५) आठ वाजे नंतर कोणालाही महायज्ञात सहभागी होता येणार नाही
(६) जे येणार नाहीत त्यांच्या जागी मंदिराचे सेवेकरी सपत्निक बसविले जातील
(७) साधारणतः दीड तासाची एकूण पूजा असेल
(८ ) घरून कोणतेही साहित्य आणावयाचे नाही
(९) हा अद्वितीय धार्मिक विधी पुर्णतः मोफत आहे.
दरम्यान, सर्व पत्रकार बांधवांना देखील परमपवित्र महायज्ञात कृपया आपण सर्वांनी सपत्निक सहभागी व्हावे. तसेच सहभागाच्या निश्चितते बाबत कृपया एस. बी. बाविस्कर (9657723898) यांना मंगळवार दि. 5 फेब्रुवारीच्या सायंकाळ पर्यंत कळवावे, असे आवाहन
मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले आहे.