मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान ‘स्वराज्य सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘राज्य रयतेचे – जिजाऊंच्या शिवबाचे’ या टॅगलाईन अंतर्गत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहे. या सप्ताहात संत गाडगेबाबा जयंती आणि मराठी भाषा दिनही समाविष्ट असल्याने, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपणारे कार्यक्रम राबवले जातील.
१९ फेब्रुवारीला मुंबईतील शिवाजी पार्क, दादर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, चेंबूर दरम्यान भव्य शिवशोभायात्रा आणि बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक उपस्थित राहणार आहेत.
‘सेल्फी विथ किल्ला’ उपक्रमांतर्गत महाराजांच्या प्रमुख किल्ल्यांचे सेल्फी पॉईंट उभारले जातील. शिवरायांच्या विचारांवर आधारित व्याख्याने, चित्रप्रदर्शन, पुस्तक प्रदर्शने आणि ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. आनंद परांजपे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची संकल्पना जनतेपर्यंत पोहोचवणे, हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवरायांच्या विचारसरणीवर प्रेरित प्रशासन चालवत आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने ‘राजमाता जिजाऊंचा शिवबा’ या संकल्पनेवर विविध उपक्रम राबवले जातील. रांगोळी स्पर्धा, ऐतिहासिक गाणी आणि पोवाडेप्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंची प्रतिमा लावण्याचा उपक्रमदुर्गसंवर्धन मोहिमेअंतर्गत गड-किल्ल्यांची स्वच्छता मोहीम विविध नेत्यांच्या उपस्थितीत उपक्रम या सप्ताहात विविध किल्ल्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
किल्ले शिवनेरी – उपमुख्यमंत्री अजित पवार
शिवाजी पार्क, मुंबई – प्रफुल पटेल, छगन भुजबळ, नवाब मलिक
किल्ले रायगड – बालविकास मंत्री अदिती तटकरे
किल्ले पन्हाळगड – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
किल्ले प्रतापगड – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
विद्यार्थी संघटनेच्या वतीने ‘रयतेचे राज्य शिवरायांचे’ या विषयावर वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच, अल्पसंख्याक सेलच्यावतीने ‘सबका राजा, शिवाजी राजा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार असल्याचे आनंद परांजपे यांनी सांगितले.