जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नवउद्योजक आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स यांना उद्योग, व्यवसाय वाढीसाठी आवश्यक कौशल्य व प्रशिक्षणासह सुसज्ज करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ‘महा ६०’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबर रोजी जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्याचे नवीन औद्योगिक धोरण २०१९ अंतर्गत कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ‘महा ६०’ कार्यक्रम (Business Accelerator Programme) सुरु केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी किमान ६० नवउद्योजकाना प्रशिक्षण दिले जात आहे. पदवीधारक, महिला, आणि सामाजिक अविकसित घटकांसाठी उद्योग स्थापनेकरीता सक्षम परिसंस्था निर्माण करणे, महाराष्ट्रातील शासकीय संस्था व इतर यंत्रणेकरीता उद्योजकता विकासाचे Framework तयार करणे, कुशल तरुण, नव उद्योजक, स्थानिक उद्योग आणि MSME घटकांकरीता उच्च दर्जाचे उद्योजकीय प्रशिक्षण देणे, बहुराष्ट्रीय कंपन्यांना तसेच देशांतर्गत व जागतिक पातळीवरील गुंतवणुकदारांना आकर्षित करणे, राज्याला स्टार्ट अप हब बनविणे या अभिनव उपक्रमाचा उद्देश आहे.
उदयोन्मुख उद्योजकाना सक्षम करणे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकसीत करणे असून भविष्यात उद्योग ऊभारू पाहणा-या उद्योजकांना उद्योजकीय मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील नवउद्योजक, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनींनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहनही महाव्यवस्थापकांनी केले आहे.