भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रनर्स ग्रुपतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी इक्वालिटी रनचे आयोजन करण्यात आले आहे.
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर रविवारी 3 मार्च रोजी संपन्न होणार आहे.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा होणार असून सदरची स्पर्धा 3 किमी, 5 किमी व 10 किमी अशा तीन श्रेणींमध्ये आयोजित केली जाणार आहे. सदरच्या स्पर्धेसाठी 3 किमीमध्ये 280, 5 किमीमध्ये 153 तर 10 किमीमध्ये 42 महिलांनी सहभाग निश्चित केलेला असून रविवारी सकाळी ठीक 6 वाजता सदरच्या स्पर्धेस सुरुवात होईल. याचबरोबर आयोजकांतर्फे प्रत्येक महिला सहभागी स्पर्धकास टी-शर्ट, विशिष्ट असा बीब क्रमांक, धावणे पूर्ण केल्यानंतर मेडल व गुडी बॅग प्रदान करण्यात येईल. त्याशिवाय धाव पूर्ण केल्यानंतर प्रत्येक सहभागी महिलेस नाश्त्याचा देखील आनंद घेता येईल.
त्यापैकी टी-शर्ट, बीब क्रमांक व गुडी बॅग ही एक दिवस आधी अर्थात शनिवारी 2 मार्च रोजी शहरातील सहकार नगर येथील आयएमए हॉल येथून सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वितरित केली जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी रोख रकमेचे बक्षिसे देखील असणार आहेत. त्यामुळे तमाम महिला वर्गामध्ये या स्पर्धेविषयी प्रचंड उत्साह आहे.
सदरच्या स्पर्धेचा मार्ग :
10 किमी: 10 किमीची स्पर्धा सकाळी ठीक 6 वाजता कोरोनेशन क्लब येथून सुरुवात होऊन जामनेर रोडवरील नाहाटा चौफुली पर्यंत धावत जाऊन तिथून पुन्हा वळसा घेऊन पुन्हा कोरोनेशन क्लब व पुढे आरपीडी रोडवर लिंपस क्लब पर्यंत जाऊन लिंपस क्लब हून पुन्हा मैदानावर परत असा 10 किमीचा मार्ग राहील.
5 किमी: सदरची स्पर्धा सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार असून कोरोनेशन क्लब ते जामनेर रोडवरील नाहाटा चौफुली व तेथून पुन्हा कोरोनेशन क्लबच्या मैदानावर परत असा 5 किमीचा मार्ग राहील. 3 किमी: सदरची स्पर्धा ठीक 7 वाजता सुरुवात होणार असून कोरोनेशन क्लब मैदानापासून अष्टभुजा देवी मंदिर व तेथून पुन्हा परत कोरोनेशन क्लबचे मैदान असा स्पर्धेचा मार्ग राहील.
या स्पर्धेनिमित्त सहभागी महिलांनी आपल्या नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास आधी मैदानावर उपस्थित राहावे व या रनचा आनंद घ्यावा असे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे.