जळगाव (प्रतिनिधी): जिल्हा नियोजन भवनात लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी २० पतसंस्थांचे ऑडिट करून प्रशासक बसविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) बी.ए.बोटे, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, सहाय्यक नियोजन अधिकारी कैलास बी. सोनार, तहसीलदार (महसुल) मंदार कुलकर्णी, पशुसंवर्धन विभागाचे डॉ.संजय गायकवाड यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ठेवीदार यांचे विविध सहकारीपतसंस्थामध्ये असलेले पैसे त्यांना मिळत नसल्याची तक्रार लोकशाही दिनात करण्यात आली. अडकलेले पैसे परत मिळावेत अशी मागणी या ठेवीदारांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ठेवीदारांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवी का ठेवली नाहीत अशी विचारणा केली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ठेवीदारांनी असलेल्या २० पतसंस्था यांचे ऑडिट करून त्यांच्यात प्रशासक नेमून पैसे परत करण्याचे प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी यांनी ठेवीदारांना दिलासा दिला. दोन वर्षापासून अमळनेरच्या संत सखाराम नागरी पतसंस्थेचे ऑडिटर काम करत नसल्यची तक्रार पतसंस्थाच्या ठेवीदारांनी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देऊन बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन ठेवीदारांना दिले.
दरम्यान, महापालिकेचा अधिकार क्षेत्रातील नागरिकांनी येऊन आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांची समस्या महापालिकेत होणाऱ्या लोकशाही दिनी मांडावी असे सांगितले. परंतु, त्या नागरिकांनी आम्हाला याची काही कल्पना नसल्याचे सांगून तुम्हीच यावर तोडगा काढावा अशी मागणी केली. यानुसार अप्पर जिल्हाधिकारी गाडीलकर यांनी १५ दिवसात कारवाईची आश्वासन दिले असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली .
या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण १७९ तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेवून सर्व तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. जेणेकरुन तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. त्याचप्रमाणे न्यायप्रविष्ठ प्रकरणे नागरीकांनी लोकशाही दिनात आणू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.