जळगाव– लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्यामार्फत जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
१४ मार्च २०१७ रोजी जळगाव जिल्ह्यात पंचायत समित्यांचीम निवडणूक होऊन १५ पंचायत समित्यांवर सभापतीची निवड करण्यात आली होती. या १५ पंचायत समित्यांवरील सभापतींसह सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी पूर्ण झालेला आहे. त्या अनुषंगाने दि.११ मार्च रोजी ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश जि.प.सीईओंना काढले होते. सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील १५ गटविकास अधिकार्यांची प्रशासक म्हणून नियुक्तीचे आदेश दिले असून त्यांनी आपल्या प्रशासक पदाची सूत्रे स्विकारल्याची माहिती जि.प.सूत्रांनी दिली.
दि.१३ मार्च रोजी जिल्ह्यातील १५ पंचायत समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण आहे. त्यामुळे या समित्यांवरील राजकीय राजवट संपुष्टात आली असून जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी ग्रामविकास विभागाच्या आदेशाने दि.१४ मार्च रोजी जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी झाले आहे. या आदेशान्वये प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीवर प्रशासकराज विराजमान झाले आहे.
जिल्ह्यातील अमळनेर येथे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, भडगावला आर.ओ.वाघ, भुसावळ येथे विलास भाटकर, बोदवड येथे एस.आर. नागटिळक, चाळीसगाव येथे ए.डी.वाळेकर, चोपडा येथे बी.एस. कोसोदे, एरंडोल येथे बी.एस.अकलाडे, धरणगाव येथे स्नेहा कुडचे, जळगाव येथे एस.बी.सोनवणे, जामनेर येथे अतुल पाटील, मुक्ताईनगर येथे एस.आर. नागटिळक, पाचोरा येथे अतुल पाटील, पारोळा येथे व्ही.डी. लोंढे, रावेर येथे दीपाली कोतवाल, यावल येथे मंजुश्री गायकवाड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेची मुदत रविवार, दि.२० मार्च रोजी संपुष्टात येणार असून त्यानंतर २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.पंकज आशिया यांच्याकडे पुढील सूत्रे येणार आहे.