नरेंद्र मोदी हे ब्लफ मास्टर- सोनिया
नवी दिल्ली वृत्तसंस्था । विद्यमान पंचवार्षिक कालखंडातील संसदीय कामकाजाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला आहे.
आज संसदीय कामकाजाचा शेवटचा दिवस आहे. यामुळे आज सरकार राफेल प्रकरणी पटलावर कॅगचा रिपोर्ट ठेवण्याची शक्यता आहे. याशिवाय, काही महत्वाचे विषयदेखील चर्चेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज लोकसभेचे कामकाज सुरू होण्याआधीच काँग्रेस खासदारांनी संसद भवनाच्या परिसरात निदर्शने केली. यात पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उपस्थित होते. या खासदारांनी राफेल प्रकरणी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. काँग्रेस खासदारांनी संसदेच्या परिसरात कागदी राफेल विमाने उडवून केंद्र सरकारची खिल्ली उडविली. याप्रसंगी सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्लफ मास्टर असल्याची टीका केली.
दरम्यान, तृणमुल काँग्रेसनेही निदर्शनास प्रारंभ केला असून यात काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी भाग घेतला आहे. या पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन वातावरण दणाणून सोडले आहे.