राममंदिर उभारणीसाठी सहभाग नोंदविणे म्हणजे संधी – जनार्दन महाराज

यावल प्रतिनिधी । जात, पात, पंथ मिळून सर्व समाजाने एकत्रित येऊन श्रीरामांचे भव्य असे राममंदिर उभारणीच्या राष्ट्रकार्यात आपला सहभाग नोंदविणे म्हणजे संधी आहे. असे प्रतिपादन फैजपूर येथील महामंडलेश्वर परमपूज्य जनार्दन महाराज यांनी केले. आज ते येथे श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र निर्माण निधी संकलन कार्यालय उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी  बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निधी संकलन तालुका समितीचे सदस्य मधुकर शिर्के उपस्थित होते. व्यासपीठावर भक्ती किशोरदासजी महाराज, ह.भ.प धनराज महाराज, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद महाजन, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धोंडू अण्णा माळी होते. 

कार्यक्रमाचे सुरवातीस उपस्थित मान्यवर व शहरातील नागरिकांची कोहळेश्वर राममंदिरातून शहराच्या मुख्य रस्त्यावरुन रॅली निघाली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्र व भारतमाता यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली. प्रास्ताविक समिती तालुकाप्रमुख राजेश्वर बारी याने केले. महामंडलेश्वर परमपूज्य जनार्दन महाराज,भक्ती किशोरदासजी महाराज व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निधी संकलन कार्यालयाचे फीत सोडून उद्घाटन झाले.

अयोध्येत प्रभू श्रीराम चंद्र यांचे मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलन हे केवळ निमित्त आहे. या अभियानात प्रत्येकाचा खारीचा वाटा असणे गरजेचे आहे. मंदिर उभारणीसाठी निधी संकलनापेक्षा या निमित्ताने प्रत्येक माणूस जोडला जाणे महत्वाचे आहे. माणसे जोडण्याचा हा प्रयत्न आहे. माणसे जोडली की देशाची प्रगती होत असते. असे विचार भक्ती किशोरदास यांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी एक लाख एक हजाराची देणगी चेक दिल्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल मोरे यांनी केले, तर अनिकेत सोरटे याने आभार मानले.

 

 

Protected Content