मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । विधानसभा अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राहूल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून उपाध्यक्षपद हे शिंदे गटाला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी होणार आहे. यात ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार असून ४ जुलै रोजी शिंदे सरकारवर विश्वासदर्शक ठरावावर मतदान होणार आहे. यातील सर्वात महत्वाचा घटक हा विधानसभाध्यक्षपद होय. या पदासाठी भाजपतर्फे आधी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव या पदासाठी समोर आले होते. तर शिंदे गटातर्फे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती. यानंतर दुपारी मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ऐवजी भाजपने राहूल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. तर उपाध्यक्षपद हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळणार असून यासाठी दीपक केसरकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आगामी काळात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेचे अध्यक्षपद हे अनुभवी नेत्याकडेच असावे असे शिंदे गट आणि भाजप यांनी ठरविले आहे. मात्र राहूल नार्वेकर यांच्यासारख्या तुलनेत अननुभवी आमदाराकडे हे पद सोपविण्यात येणार आहे. ते विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. विशेष बाब म्हणजे ते शिवसेनेतून भाजपमध्ये आले असून कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सोबत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.