मुंबई प्रतिनिधी । भाजपने बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी ‘ऑपरेशन लोटस’ सुरू केले असून याची जबाबदारी पक्षात अलीकडेच दाखल झालेल्या चार नेत्यांवर जबाबदारी टाकल्याची माहिती समोर आली आहे.
सत्ता स्थापनेचा पेच आता सुप्रीम कोर्टात पोहचला असून यावर उद्या सकाळी निर्णय होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाआघाडी एकसंघ असल्याचे दिसून आल्याने आता भाजपने राज्यात ‘ऑपरेशन लोटस
राबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक आणि बबनराव पाचपुते या चार नेत्यांवर टाकण्यात आल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली आहे.
कर्नाटकात विरोधी पक्षाच्या आमदारांना गळाला लावण्यात येऊन भाजपने सत्ता स्थापन केली होती. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फोडण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यातील काही आमदारांनी ही माहिती आपल्या श्रेष्ठींना देण्यात आली असून यातूनच याबाबतची माहिती समोर आली आहे.