मुंबई वृत्तसंस्था । अभिनेत्री दीपिकाच्या ‘छपाक’ या आगामी चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून ठरल्याप्रमाणे हा सिनेमा येत्या दि.१० जानेवारी रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे.
दीपिका पदुकोण आणि विक्रांत मेसी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छपाक’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर आज, बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी मागे घेतली. “सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराईट कसा होऊ शकतो?”, असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने उपस्थित केला. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी स्थगितीची मागणी मागे घेतली. कथेतील इतर घटनांशी साधर्म्य आढळल्यास कोर्टात दाद मागण्याचा पर्याय हायकोर्टानं याचिकाकर्त्यांसाठी खुला ठेवला आहे.
राकेश भारती यांनी छपाकच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी केली होती. त्यावर मंगळवारी दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. कायद्यानुसार, सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराइटचा दावा केला जाऊ शकत नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी विनंती गुलजार यांनी केली होती. प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसंच चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण करण्याच्या हेतूनं किंवा त्यात विलंब करण्याच्या उद्देशानं ही याचिका दाखल करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला होता.