मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात केमिकलयुक्त बनावट ताडीची खुलेआम विक्री सुरू असून या प्रकारामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात नागरिकांकडून अन्न-औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.

ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर केमिकल वापरून तयार केली जाणारी ही बोगस ताडी दररोज लाखो रुपयांच्या उलाढालीसह विक्री केली जात असल्याचे समोर येत आहे. उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रात महिन्यातून केवळ एकदाच फेरी मारतात, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या अवैध धंद्याला बळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

मुक्ताईनगर शहरात किंवा तालुक्यात एकही ताडीचे झाड नसतानाही रोज मोठ्या प्रमाणावर ताडी कशी काय उपलब्ध होते, हा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. ताडीचे लायसन्स असूनही ज्या परिसरात ताडीची झाडे नाहीत, तेथे ताडी येते कुठून आणि ती पिण्यायोग्य आहे की नाही, याबाबत प्रशासन मुळीच पडताळणी करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ताडीच्या नमुन्यांची चाचणी नियमित केली जाते का, वाहतूक कशी होते, याबाबतही संबंधित विभागांकडून कोणतीही माहिती दिली जात नाही.
या संपूर्ण प्रकरणात अन्न-औषध विभाग आणि काही अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध असल्याचेही नागरिकांमध्ये चर्चिले जात असून हे गंभीर संकेत आहेत. ताडी विक्रीबाबत कोणतीही कडक कारवाई न होत असल्याने हा धंदा दिवसेंदिवस फोफावत चालला आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुक्ताईनगर तालुका ‘ताडीमुक्त’ करणार का, तसेच केमिकलयुक्त ताडी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून जोरदारपणे उपस्थित केला जात आहे.



