मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी शिक्षण हक्क अधिनियम अर्थात आरटीई अंतर्गत 25 टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस शुक्रवार 17 मे 2024 पासून प्रारंभ झाला आहे. आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत 25 टक्के आरक्षित कोट्यातून विनामूल्य प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील 319 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 5,670 जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.
आरटीईअंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत शुक्रवार, 31 मे 2024 पर्यंत असणार आहे. तत्पूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाईन पद्धधतीने अर्ज केला असला तरी त्याचा या प्रवेश प्रक्रियेत विचार केला जाणार नाही. पालकांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे, असे देखील शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या बालकांनी यापूर्वीच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळा विभाग) राजू तडवी यांनी केले आहे.