कांदा अनुदानासाठी शेतकर्‍यांची शासनाला आर्त हाक !

kanda

चाळीसगाव दिलीप घोरपडे । कांदा उत्पादक शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

याबाबत वृत्त असे की, या वर्षी कांद्याला अत्यंत कवडीमोल भाव मिळाला असल्यामुळे शासनाने क्विंटल मागे दोनशे रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र हे अनुदान शेतकर्‍यांना अद्याप मिळाले नसल्याने अनुदान मिळण्याच्या आशेवर असलेले शेतकरी बाजार समिती व बँकांमध्ये दररोज पायपीट करीत आहेत. आत्ता पेरणीची वेळ जवळ आली असली तरी वर्षभर दुष्काळ असल्याने बी-बियाणे व खते घेण्यासाठी शेतकर्‍यांच्या हातात आज पैसे नसल्याने शेतकरी या अनुदानाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. हे पैसे मिळाल्यास पेरणीसाठी ची बर्‍यापैकी अडचण छोट्या शेतकर्‍यांची दूर होणार असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी बोलून दाखवले आहे

शासनाने शेतकर्‍यांना जाहीर केलेल्या कांदा अनुदानापैकी फक्त १ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंतच्या नोंदणी झालेल्या शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यात हे अनुदान मिळाले आहे. मात्र त्यानंतर १६ डिसेंबर २०१८ पासून ते २८ फेब्रुवारी २०१८ पर्यंतच्या मुदतीत नोंदणी झालेल्या जवळपास ३९४५ शेतकर्‍यांना ह्या अनुदानाचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने हे शेतकरी लाभापासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांची शासनाकडे घेणे रक्कम जवळपास ४ कोटी ५० लाखांपर्यंत असेल शेतकरी ही रक्कम आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शासनाकडे मोठ्या आशेने पाहत असून दररोज कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव व संबंधित बँकांमध्ये चकरा मारीत आहेत. यामुळे संबंधित यंत्रणेने या वंचित लाभार्थी शेतकर्‍यांचा विचार करून त्यांना लवकरात लवकर अनुदान कसे मिळेल यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे जेणेकरून आता पेरणीसाठी बी बियाणे व खते घेण्याकरिता शेतकर्‍यांच्या हातात पैसे येतील अशी अपेक्षा शेतकरी वर्ग धरून आहे.

Protected Content