काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसह एका पोलीस उपअधीक्षकास अटक

kashmir police

श्रीनगर, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीस दलाच्याच एका पोलीस उपअधिक्षकाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या या पोलीस उपअधिक्षकाला राष्ट्रपती पदक पुरस्कारानेही गौरवण्यात आलेले आहे. देविंदर सिंह असे या पोलीस अधिक्षकाचे नाव असून तो एअरपोर्ट सिक्युरीटीसाठी तैनात होता, अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्यासाठी देविंदर सिंह मदत करत होता, असा त्याच्यावर आरोप आहे.

 

सुरक्षा दलाच्या जवानांनी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंडच्या मीर बाजार परिसरात दहशतवाद्यांसोबत कारने जात असताना देविंदर सिंह याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यासोबत सैय्यद नवीद मुश्ताक उर्फ नवीद बाबू आणि आसिफ राथर या दोन दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधिक्षक देविंदर सिंह याला गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पुरस्काराने गौवरविण्यात आले होते. त्यावेळी ते जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एन्ट्री हायजॅकिंग पथकात कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली होती. याआधी २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर देविंदर सिंह याचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी ते पोलीस निरीक्षक असताना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये सामील होते. अँटी टेरर ऑपरेशननंतर त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी नाविद हा हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर असून राथर हा तीन वर्षांपूर्वीच दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, सिंह यांना अटक केल्यानंतर तात्काळ त्याच्या घरी छापा मारण्यात आला असता त्याच्या घरी पाच ग्रेनेड आणि तीन एके ४७ रायफल सापडल्या आहेत. अटक केलेल्या पोलीस उपअधिक्षकाकडे कसून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

Protected Content