
अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे शिवारात एका अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीने मोठा हानीकारक परिणाम घडवून आणला असून, शेतातील शंभर क्विंटल ज्वारी, चारा व शेती साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. ही आग ११ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास लागली असून, स्थानिक शेतकरी ज्ञानेश्वर एकनाथ बडगुजर यांच्या शेताला या आगीचा मोठा फटका बसला आहे.

ज्ञानेश्वर बडगुजर यांनी मारवड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे कळमसरे शिवारात सुमारे पाच बिघे शेत असून, त्या शेतात त्यांनी ज्वारीचे पीक घेतले होते. काढणी झाल्यानंतर त्यांनी ज्वारी ढीग करून शेतात साठवून ठेवली होती. एकूण शंभर क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र, शेजारील शेतात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे ही आग पसरून बडगुजर यांच्या शेतापर्यंत पोहोचली. त्यामुळे ज्वारीची गंजी, चारा आणि इतर शेतीचे साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.
या आगीमुळे बडगुजर यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यामुळे ते प्रचंड संकटात सापडले आहेत. याप्रकरणी मारवड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास स्थानिक प्रशासनाने दिला आहे.


