मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर स्थिर सरकारची अपेक्षा होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे आणि ऑपरेशन टायगरमुळे नवे राजकीय समीकरण आकार घेत असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, ही भेट मुंबईतील बावनकुळे यांच्या बंगल्यावर मंगळवारी रात्री ८ वाजता झाली. या चर्चेला भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. बैठकीत तब्बल एक तास महत्त्वाची चर्चा झाल्याचे समजते. जयंत पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत सांगितले की, “ही भेट केवळ मतदारसंघातील महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी झाली. त्यांना वेगवेगळ्या विषयांवर निवेदनं दिली.” त्याचवेळी बावनकुळे यांनीही ही भेट “खासगी कारणासाठी” होती असे स्पष्टीकरण दिले.
मात्र, या स्पष्टीकरणांनंतरही राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. कारण जयंत पाटील सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर मौन बाळगून आहेत. मस्साजोग प्रकरण, साहित्य संमेलनातील वाद आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळेच ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
जयंत पाटील यांच्याविषयी राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्येही अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्षांमुळे त्यांची अस्वस्थता वाढल्याचे सांगितले जात आहे.
यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “जयंत पाटील यांच्या देहबोलीत बदल दिसतोय. राष्ट्रवादी शरद पवार गटामधील गटबाजीमुळे ते नाराज आहेत. त्यामुळे भविष्यात ते भाजपमध्ये गेले तरी आश्चर्य वाटणार नाही.” या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन टायगर जोरात सुरू आहे. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरू शकतात.


