ग्रामसेवक युनियनचे विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन (व्हीडीओ)

079ff787 a63c 4c4e ba61 20513b358094

जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या आणि पाचव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने क्रांतिदिनापासून शासनाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार आज सकाळी जळगाव जिल्हा परिषद समोर ग्रामसेवक युनियन डीएनईतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

ग्रामसेवक युनियन डीएनईतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करणे, ग्रामसेवकांना शासन निर्णयानुसार प्रवास भत्ता द्यावा, शैक्षणिक अर्हता बदलवून पदवीधर ग्रामसेवक नेमण्यात यावे, २०११ च्या लोकसंख्येनुसार ग्रामसेवकाचे साजे व पदे वाढवावी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची वेतनातील त्रुटी दूर कराव्या, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, जिल्हा व राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवकांना आगावू वेतनवाढ द्यावी, एक गाव, एक ग्रामसेवक निर्माण करावा, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करून विभागाशिवाय इतर कामे देऊ नये, आदी मागण्यांचा समावेश आहे.

 

आज आंदोलनाचा दुसरा टप्पा

 

ग्रामसेवक युनियन डीएनईतर्फे क्रांतीदिनापासून ७ टप्प्यात असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्टला पंचायत समिती समोर दुसऱ्या टप्प्यात १३ ऑगस्टला जिल्हा परिषदेसमोर तर तिसऱ्या टप्प्यात १६ ऑगस्टला आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. चौथ्या टप्प्यात पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ग्रामसेवक एकत्र होत निवेदन देतील. २० ऑगस्टला ग्रामविकास राज्यमंत्री आणि प्रधान सचिवांचे शासकीय निवासस्थानासमोर एकदिवसीय उपोषण, २१ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना, संघटनेचे सर्व जिल्हा सचिव निवेदन देतील आणि अखेरच्या टप्प्यात २२ ऑगस्टपासून राज्यभर सर्व ग्रामसेवक कामबंद आंदोलन करीत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.

 

Protected Content