मुंबई प्रतिनिधी | राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या सरकारने विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या आमदार निधीमध्ये एक कोटी रूपयांची वाढ करण्याचा निर्णय आज जाहीर केला आहे.
सध्या राज्यातील विधानपरिषद तसेच विधानसभेच्या आमदारांचा विकास निधी ३ कोटी रुपये आहे. त्यात १ कोटीची वाढ करण्यात आल्यामुळे तो चार कोटीपर्यंत पोहोचला आहे. याआधी यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये एक कोटी रुपयांची वाढ करण्यात आली होती. ही वाढ करताना बांधकाम व इतर साहित्याच्या दरात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं होतं. अर्थमंत्री अजित पवार यांनी सन २०२०-२१चा अर्थसंकल्प सादर करताना स्थानिक विकास निधीमध्ये वाढ करण्यात येईल अशी घोषणा केली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे हा विकास निधी देणे शक्य झाले नव्हते. एका वर्षानंतर अजित पवार यांनी या अश्वासनाची पूर्तता केली होती. फेब्रवारी महिन्यातील निर्णयानुसार आमदारांना स्थानिक विकासासाठी ३ कोटी रुपये देण्यात येत होते.
यानंतर आता पुन्ही निधीमध्ये एक कोटींची वाढ करण्यात आली असून प्रत्येक आमदाराला दरवर्षी चार कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. या निर्णयाचे दोन्ही सभागृहातील सदस्यांनी स्वागत केले आहे.