यावल – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हैसवाडी येथील प्रौढ व्यक्तीने दुर्धर आजाराला कंटाळून पाडळसा शिवारातील कोरड्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीला आली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष राजाराम कोळी (वय-४८) रा. म्हैसवाडी ता. यावल असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “संतोष खोडे हे आपल्या आईवडील, पत्नी, एक मुलगा आणि चार मुलींसह वास्तव्याला आहे. त्यांना गेल्या काही महिन्यांपासून दुर्धर आजार जडलेला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान या आजाराला कंटाळून सोमवारी, १४ मार्च रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात कोणाला काहीही न सांगता ते निघून गेले.
दरम्यान कुटुंबाने त्यांना सर्वत्र शोधाशोध केला असता यावल तालुक्यातील पाडळसा शिवारातील जीवन बोरसे यांच्या शेतातील विहिरीत दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सपोनि सिद्धेश्वर अखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. हेमंत सांगळे, किरण चाटे, महेश वंजारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. लिलाधर कोळी यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक महेश वंजारी करीत आहे.