यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथे डोणगाव रोडवरील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये पर्यावरण संवर्धनाचा एक अनोखा उपक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. ‘एक वर्ग, एक वृक्ष’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतःहून झाडे लावून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनामनात निसर्गप्रेमाची बीजं रोवणारा ठरला.
शाळेमध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत एकूण १७ वर्ग असून, प्रत्येक वर्गाने एक झाड लावण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने व उत्साहात सहभागी होत विविध प्रकारची झाडे निवडली. यात वड, पिंपळ, निंब, आंबा, अशोक, सिसम व चिंच यांसारख्या देशी व औषधी गुणधर्म असलेल्या झाडांचा समावेश होता. झाडे लावल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याचे औक्षण केले व ती झाडे जगवण्यासाठी नियमित काळजी घेण्याची शपथ दिली. “या झाडांची देखील आमच्याप्रमाणेच काळजी घेऊ,” असे आश्वासन देणारे विद्यार्थ्यांचे शब्द उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले.

शाळेचे संस्थापक चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनीष विजयकुमार पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव तसेच सर्व शिक्षकांनी या उपक्रमात आपल्या वर्गासमवेत सक्रिय सहभाग घेतला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व सांगून त्यांच्यात पर्यावरण संवेदनशीलता निर्माण केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ झाडे लावली नाहीत तर भविष्यातील हिरवळ वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली.
या उपक्रमामुळे शाळा परिसरात एक वेगळीच हिरवळ फुलली आहे. विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण हे एक कर्तव्य मानून पुढील पिढ्यांसाठी निसर्गाचा ठेवा जपण्याची भावना अंगीकारली आहे. ‘एक वर्ग, एक वृक्ष’ ही संकल्पना शाळेपुरती मर्यादित न राहता सर्वत्र पसरावी, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.



