चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रस्त्यावरील ट्रॅक्टर बाजूला घेण्याबाबत सांगितल्याचा राग येऊन एकाने डोक्यात रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची थरारक घटना तालुक्यातील कृष्णापूर तांडा (तळेगाव) येथे घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त, “तालुक्यातील कृष्णापूर तांडा (तळेगाव) येथील उमेश रमेश चव्हाण (वय-२७) हा वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. चव्हाण यांच्या घरी रविवार, दि. ८ मे रोजी रात्री ९:३० वाजता जाऊळचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेव्हा शेजारी राहणारे काका धोंडीराम भिका चव्हाण यांनी घरासमोरील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर व खाट टाकलेली होती. उमेश यांनी घरी कार्यक्रम असल्यामुळे आपण ट्रॅक्टर व खाट बाजूला करण्याविषयी सांगितले. त्याचाच राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करून मारायला सुरुवात केली.
वडील रमेश भिका चव्हाण यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तान्हाजी धोंडीराम चव्हाण व कैलास लक्ष्मण राठोड यांनी रमेश भिका चव्हाण यांना चापट बुक्क्यांनी मारहाण केली. तर प्रविण धोंडीराम चव्हाण व धोंडीराम भिका चव्हाण या दोघांनी शिवीगाळ करून रमेश चव्हाण यांना जमीनीवर खाली पाडून पकडून ठेवले. तेवढ्यात कैलास लक्ष्मण राठोड यांनी त्याचे हातातील लोखंडी रॉडने डोक्यात मारून चव्हाणांना गंभीर दुखापत केली. व आमच्या नांदी लागल्यास जिवे ठार करू. अशी धमकी धोंडीराम भिका चव्हाण यांनी दिली. दरम्यान या वादात रमेश चव्हाण यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या घटनेप्रकरणी उमेश रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तान्हाजी धोंडीराम चव्हाण, प्रविण धोंडीराम चव्हाण, धोंडीराम भिका चव्हाण तिन्ही रा. कृष्णानगर तांडा ता. चाळीसगाव व कैलास लक्ष्मण राठोड रा. करगांव तांडा नं. ३ ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.