गावठी पिस्तूलासह एकाला अटक !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।अमळनेर शहरातील पैलाड भागातील महादेव मंदिराजवळ बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचा पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयित आरोपीला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीच्या पिस्तूल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील पैलाड भागातील चोपडा रोडवर असलेल्या वर्णेश्वर महादेव मंदिर येथे एक तरुण हातात गावठी बनावटीचे पिस्तूल, चाकू, फायटर असे घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर, किशोर पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, रवींद्र पाटील सिद्धांत शिसोदे, शरद पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी अविनाश बाळू शिरसाट (वय-२६) रा. वाडी बुद्रुक ता. शिरपूर जि. धुळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल चाकू, फायटर, दोन हँडसेट मोबाईल असा एकूण २७ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक शरद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अविनाश शिरसाट याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.

Protected Content