जामनेर प्रतिनिधी । शहरातील नगरपालिका चौकात जाणाऱ्या रिक्षाची ट्रॅफिक पोलिसाने चौकशी केली असता त्यामध्ये अवैधरित्या शंभर लिटर ताडी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा व आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, छोटू शान गवळी (रा.कनाळा तालुका भुसावळ) असे आरोपीचे नाव आहे. जामनेर शहरातून शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भुसावळकडून बोदवड कडे जाणारी रिक्षा नगरपालिका चौकामध्ये ट्राफिक हवालदार शिवाजी पाटील यांना दिसली. यावेळी त्यांनी रिक्षा चालकाकडे गाडीचे दस्तावेज मागितले. मात्र यावेळी गाडीमध्ये असलेल्या थैल्या मध्ये काय आहे, हा संशय आल्याने पोलिसांनी तपासणी केली असता तीन चाकी रिक्षा मध्ये 100 लिटर गोड ताडी असल्याचे निदर्शनात आले. त्यामुळे अवैधरित्या ताडी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व आरोपीवर पोलीस नाईक शिवाजी संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी छोटू गवळी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पंधरा अ प्रमाणे जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस नाईक दिलीप वाघमोडे, नितीन जाधव मुकेश आमोदकर यांनी केली असून या गुन्ह्याचा तपास मुकेश आमोदकर करीत आहे.