चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील मेहुणबारे शिवारात ३० जून रोजी ठार मारण्यात आलेल्या मादी बिबट्याच्या प्रकरणातील आरोपी दिलीप नारायण गांगुर्डे याला आज (दि.३१) नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील आलीयाबाद येथील त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली आहे. त्याला आज येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता ५ ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या आरोपीकडून या गुन्ह्यातील अन्य आरोपींची नावेही कळली असून अधिक तपास सुरु आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यात अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पाची ‘वाईल्ड लाईफ सेल’ आणि जळगाव येथील गस्ती पथकाचे विशेष सहकार्य लाभले. ही कारवाई येथील वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, तहाराबादचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश कांबळे, जायखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, मुल्हेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.पी. काळे, वनपाल रुपेशकुमार दुसाने, पी.आर. परदेशी, अंबादास थैल, पो.कॉ. देविदास माळी व रामदास चौरे, वनपाल संजय चव्हाण, संजय जाधव, खाकुराम बडूरे, प्रकाश देवरे, प्रवीण गवारे, एम. मोरे, जे.के. अहिरे, एस. बहिरम, व्ही.एस. सोनावणे, ए.एन. कोळी, राहुल पाटील, वनरक्षक अजय महिरे, दिनेश कुलकर्णी, राहुल मांडोळे यांनी सहभाग घेतला होता.