जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील शहापूर येथील रहिवाशी सेवानिवृत्त मुख्याध्यापक संतोष बोरसे (रा. शहापूर) यांनी मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले सव्वा लाख लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी बँकेतून 1,22000/-रु.त्यांचे नावे असलेला चेक जमा केला व थोड्या वेळाने बँकेतुन 1 लाख 22 हजार रूपये ताब्यात मिळाले तेव्हा हे बँकेतून पैसे व त्यांच्या जवळील असलेले रोख 3000 रुपये असे एकुण सव्वा लाख रूपये त्यांच्या नावे असलेले कृषी स्टेट बँकेचे व पत्नीचे नावे खाते असलेले पासबुक, चेकबुक असलेली कापडी पिशवीत डिक्कीत ठेवली व एक लाख पंचवीस हजार रुपये काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. त्यानंतर ते शहापूरकडे जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीवर असलेल्या दोन भामट्यांनी बँकेपासून त्यांच्यावर पाळत ठेवली होती. भामट्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. वर्धमान पेट्रोल पंपाजवळ त्यांनी बोरसे यांना गाठले. तसेच ‘काका तुमचे पैसे खाली पडले’ असे सांगितले. त्यामुळे बोरसे यांनी थांबून पाहणी केली, याचवेळी भामट्यांनी हातचलाखी करून दुचाकीच्या डिक्कीतून सव्वा लाखांची रोकड लंपास केली. घटनेनंतर दोन्ही भामटे सुसाट वेगाने पसार झाले.
यापूर्वी याच परिसरातून सज्जन पाटील नावाच्या व्यक्तीलाही अशाप्रकारे गंडवून दीड लाख रुपये लांबवण्यात आले होते. तर युनियन बँकेतून पैसे काढून येणार्या प्रौढालादेखील एक लाख रुपये गमवावे लागले होते. अशाप्रकारची तिसरी घटना घडल्याने नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. सोबत पैसे बाळगताना लक्ष विचलित होऊ देऊ नये. शहरात सलग घडणार्या या घटनांमागे सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसांत भारतीय दंड साहित्य 1860 कलम 379 अन्वये जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरविंद मोरे तपास करत आहेत.