रावेर, प्रतिनिधी | माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पक्षांतर केल्यास आपली भूमिका काय असेल? यावर खा. रक्षाताई खडसे यांनी भाऊंनी निर्णय घेतल्यानंतर बघू, अशी सावध प्रतिक्रिया देवून प्रश्नाला बगल दिली. त्या आज तालुक्यातील कर्जोत येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या होत्या.
भाजपा पक्षातील काही लोकांच्या कारवायांबद्दल नाराजी व्यक्त करून भविष्यात वेगळा विचार करण्याचा इशारा काल (दि.७) देताच जिल्ह्यासह राज्य भाजपामध्ये एकच खळबळ उडाली होती. खा. श्रीमती खडसे आज (दि.८) राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त मौलाना अब्दुल कलाम सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमासाठी तालुक्यातील कर्जोत येथे आल्या होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला की, नाथाभाऊंनी पक्षांतर केल्यास आपली काय भूमिका असेल ? अत्यावर खा. रक्षाताई खडसे यांनी मौन साधत, भाऊंनी निर्णय घेतल्यानंतर बघू, असे मोघम उत्तर देवून प्रश्नाला बगल दिली. या कार्यक्रमानंतर त्या लगेच अधिवेशनासाठी नवी दिल्लीकडे रवाना झाल्या. दरम्यान नाथाभाऊ आगामी काळात काय निर्णय घेतात तसेच त्यांनी काही वेगळा निर्णय घेतल्यास श्रीमती खडसे यांची भूमिका काय असेल ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.