नवी दिल्ली वृत्तसंस्था | कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटचा अनेक देशांमध्ये प्रकोप झाल्याचे दिसून येत असून यावरून जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
जगभरात आता ओमायक्रॉनची दहशत पसरली आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल २८ कोटींचा टप्पा पार केला असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८४,९१७,११० वर पोहोचली आहे. तर ५,४३८,८९७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे.
ओमायक्रॉन आणि डेल्टा मिळून कोरोनाची त्सुनामी आणत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येत चिंतेत भर टाकलेली असतानाच आता थकज ने हा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन आणि डेल्टाची त्सुनामी प्रचंड काम करणार्या आरोग्य यंत्रणांवर मोठा तणाव आणेल असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. या तणावामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडेल असा इशाराच त्यांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत असल्याचे आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.
या संदर्भात आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस म्हणाले की, मला ओमायक्रॉनसंबंधी फार चिंता आहे, हा फार संसर्गजन्य आहे. डेल्टा असतानाच ओमायक्रॉन आल्याने केसेसची त्सुनामी येत आहे. तसेच गेल्या आठवड्यात जागतिक रुग्णसंख्या ११ टक्क्यांनी वाढली असून अमेरिका आणि फ्रान्स यांनी बुधवारी सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.