नवी दिल्ली वृत्तसंस्था । कुस्तीपटू सागर धनकड याच्या मृत्यू प्रकरणी दोन वेळा ऑलींपीक पदक मिळवणारा ख्यातनाम मल्ल सुशीलकुमार याला फरार घोषीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर कुस्तीपटूंच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत कुस्तीपटू सागर धनकडचा मृत्यू झाला होता. दोन गटामध्ये झालेल्या भांडणात सागर, अमित आणि सोनू गंभीर जखमी झाले. नंतर उपचारादरम्यान सागरचा मृत्यू झाला. जखमीने सुशीलचे नाव घेतले होते. याशिवाय अटक आरोपी प्रिन्स दलाल याच्या मोबाईलवरून सुशीलचे काही व्हिडिओही सापडले होते, ज्यात सुशील मारहाण करताना दिसला होता.
या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोन वेळा ऑलिम्पिक पदकविजेते सुशीलकुमार विरोधात लूक आउट नोटीस बजावली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी घटनेच्या दिवशी सागरचे दोन सहकारी असलेल्या जखमी कुस्तीपटू रवींद्र आणि भगत सिंग यांचेही जबाब नोंदवले आहेत. अपहरण आणि हल्ला केल्याच्या प्रकरणात या दोघांनीही सुशीलचे नाव घेतले आहे.
पोलिसांनी चौकशीसाठी सुशील कुमार व इतर कुस्तीपटूंना नोटीस पाठवल्या गेल्या आहेत. यानंतरच रात्री घटना घडली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रिन्स दलालच्या मोबाइलशिवाय उर्वरित पाच कारचीही पोलिसांनी एफएसएल चौकशी केली आहे. तर पोलिसांनी सुशीलकुमारचा शोध सुरू केला असला तरी त्याचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही.