जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर भागातील पुलाजवळील दत्त मंदीराजवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून नाश्ता करत असलेल्या वृध्दाच्या पायावरून शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षाचे चाक गेल्याने गंभीर दुखापत झाल्याची घटना गुरूवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील सुरेशदादा जैन नगरात आधार काशिनाथ नन्नवरे (वय-७५) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरूवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी नगरातील दत्तर मंदीराजवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून आधार नन्नवरे हे नास्ता करत होते. त्यावेळी पुलावरुन भरधाव रिक्षा (एमएच १९ – ५४५१) आली व तिचे चाक आधार नन्नवरे यांच्या डाव्या पायाच्या पंजावरुन गेले. नागरिकांनी रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र रिक्षाचालक भरधाव वेगात निघून गेला. रिक्षामध्ये शाळेचे मुले होते. बाबाचा पाय दाबला गेला रिक्षा थांबवा, असे मोठमोठ्याने ही मुले ओरडत होते. परंतु चालक रिक्षा घेवून पसार झाला होता. याप्रकरणी नन्नवरे यांनी शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रिक्षावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय झाल्टे करीत आहे.