यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे खळ्यासमोरील उकीरड्यावर माती टाकली याचा राग येवुन दोघांनी एका ७२ वर्षीय वृध्दाला मारहाण केल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, कृष्णाजी यादव झांबरे ( वय ७२ रा. कोरपावली ) यांचा कोरपावली गावात सातोद रस्त्यावर खळे आहे. या खळ्या समोर अनधिकृतरित्या गावातीलच रमेश राजाराम महाले यांनी उकीरडा टाकला. तेव्हा हा उकीरडा हटवावा असे त्यांनी सांगीतले होते. तेव्हा त्यांनी न हटवल्याने झांबरे यांनी त्यावर माती टाकली तेव्हा याचा राग येवुन रमेश राजाराम महाले व त्यांचा मुलगा प्रविण रमेश महाले या दोघांनी झांबरे हे खळ्यात असतांना त्यांच्याशी वाद घातला व त्यांच्या तोंडावर आणी नाकावर पावड्याने हल्ला करीत त्यांना रक्तबंबाळ केले. यात ते जागेवर बेशुध्द पडले तेव्हा त्यांना तात्काळ यावल ग्रामिण रूग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले.
रूग्णालयात निलीमा पाटील, संजय जेधे यांनी प्रथमोपचार केला. यानंतर त्यांना जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचार्थ हलवण्यात आले असुन त्यांची प्रकृती गंभीर असून या बाबत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.