अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कठोरा गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १९ जुलै रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पेमा सूडया बारेला (वय ६८, रा. किसन फलिया, लिंबाई पो. इंद्रापूर ता. राजपूर जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे मयत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पेमा बारेला हे वृध्द आपल्या कुटुंबासह जळगाव तालुक्यातील कठोरा येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी १९ जुलै रोजी रात्री ९ वाजता ते दुचाकीने कामावरून घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीचा जोरदार धडक दिली. या अपघातात पेमा बारेला हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला होता. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले असा परिवार आहे.

Protected Content